टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 जून 2021 – कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांत येणारा अधिक खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अधिसूचनेला मंजूरी दिली आहे. शहरांच्या वर्गीकरणानुसार दरआकारणी होणार आहे.
वॉर्डमधील नियमित विलगीकरण (प्रती दिवस) – अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये. यात गरजेची ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च आणि जेवण याचा समावेश आहे. कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागणार. केवळ मोठ्या चाचण्या आणि तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधे यातून वगळली आहेत.
व्हेंटीलेटरसह आयसीयू आणि विलगीकरण – अ वर्ग शहरांसाठी ९००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ६७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५४०० रुपये.
केवळ आयसीयू आणि विलगीकरण – अ वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये.
नव्या अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश दिले जावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.
खाजगी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी ८० टक्के बेड्ससाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार आणि उर्वरित २० टक्के बेड्ससाठी खाजगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचना काल संपली.
आज त्यास मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा केली . दरांसाठी शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण केले आहे. अ, ब, क अशा गटात शहरे व भागांची विभागणी केलीय. त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असणार आहे. पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेने कमी खर्चात उपचार होतील.