टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 8 मे 2021 – सीरम इन्स्टिट्यूटकडून इंग्लंडला पाठविण्यात येणारा कोविशिल्ड लसचा साठा भारतासाठी उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे देशामध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी करोनावरील लसच्या सुमारे 50 लाख डोसची व्यवस्था होणार आहे.
सीरम आणि ऍस्ट्राझेनेका कंपन्यांमधील करारामुळे कोविशिल्डचे डोस इंग्लंडला पाठवले जाणार होते. मात्र, भारतातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि लस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ते डोस स्वदेशात वापरण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.
आता हे डोस 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी उपलब्ध केले जाणार असून ते डोस खरेदी करण्याची प्रक्रिया सीरमशी संपर्क साधून तातडीने सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केल्या आहेत.
संबंधित डोसवर कोविशिल्डचे नव्हे; तर कोविड-19 व्हॅक्सिन ऍस्ट्राझेनेका अशा नावाचे लेबल असणार आहे. भारताने 1 मेपासून करोना लसीकरणाची व्याप्ती आणखी वाढवली जाणार आहे. त्यानुसार 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले होते. मात्र, लसचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण प्रक्रिया थांबली आहे. आता सुमारे 50 लाख डोसची व्यवस्था होणार आहे.