मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर ठाकरे गटाने नवा आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाचवेळी पाच पाच सरकारी बंगले वापरण्यासाठी घेतले आहेत. मुख्यमंत्रीपदावरील ‘निस्वार्थी व्यक्ती’ एकाचवेळी पाच-सहा बंगल्यांवर ताबा ठेवते हा महाराष्ट्राच्या राजकारणातील विक्रम आहे, अशी खोचक टिप्पणी दैनिक ‘सामना’तील रोखठोक या सदरातून करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळात असताना एकनाथ शिंदे यांनी ‘नंदनवन’ बंगला वास्तव्यासाठी घेतला. दोन सरकारी बंगले एकत्र करून त्यांनी ‘नंदनवन’ बंगल्याचा विस्तार केला. मुख्यमंत्री म्हणून ‘नंदनवन’मध्येच राहीन असे त्यांनी जाहीर केले, पण आता त्यांनी ‘नंदनवन’वर ताबा ठेवून ‘वर्षा’वर मुक्काम हलवला. आणि आता कार पार्किंग आणि भेटायला येणाऱ्यांची गर्दी म्हणून ‘अग्रदूत’ व ‘तोरणा’ हे बंगलेही ताब्यात घेतले. त्याहीपुढे ते गेले व पक्ष कार्यालयास जागा हवी म्हणून मंत्रालयासमोरील ‘ब्रह्मगिरी’ बंगल्याचाही ताबा घेतला. जमुख्यमंत्रीपदावरील ‘निःस्वार्थी व्यक्ती’ एकाच वेळी पाच-सहा बंगल्यांवर ताबा ठेवते हा महाराष्ट्राच्या राजकारणातील विक्रम आहे, असे ‘सामना’त म्हटले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यावर काय स्पष्टीकरण देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना पक्ष फोडल्याचे इनाम म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. नारायण राणे आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) या नेत्यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारल्यानंतर हा लाभ झाला नव्हता. पण एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नेतृत्त्व करण्याची आणि नेता म्हणून प्रतिष्ठा कमावण्याची संधी गमावली. आता असे चित्र निर्माण झाले आहे की, भाजप शिवसेनेचा काटा काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर कॉन्ट्रॅक्ट किलरप्रमाणे करत आहे. हे लोकांना पसंत नाही. अशा कॉन्ट्रॅक्ट किलर्सचा राजकीय अंतही वाईट होतो, हे महाराष्ट्राचा इतिहास आणि हिंदू धर्मशास्त्र सांगते. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुले एकनाथ शिंदे यांनी जमल्यास स्वत:ला आवरता आले तर बघावे, असा सल्लाही ‘दैनिक’ सामनातील रोखठोक या सदरातून देण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नाहीत, असा शिंदे व फडणवीस यांचा आक्षेप होता, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त आठ दिवसांतून एकदाच कॅबिनेटच्या दिवशी मंत्रालयात जातात हे आता समोर आले. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय त्यांच्या टोळीचे आमदारच चालवितात. मुख्यमंत्री म्हणून मी जनतेची सेवा करतोय, असे श्री. शिंदे वारंवार सांगतात. शिंदे कोणती सेवा करतात ते आता स्पष्ट झाले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कारवाईच्या धमक्या देऊन आपल्या गटात आणणे हीच त्यांची जनसेवा, असा टोलाही ‘रोखठोक’मधून लगावण्यात आला आहे.