मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (Maharashtra Pradesh Congress Committee Delegates meeting) नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी (AICC delegate) यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन दिले व सर्व प्रदेश प्रतिनिधींनी हा ठराव एकमताने मंजूर केला. तसेच सदर बैठकीत खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी विनंती करणारा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले, हा ठरावही सर्व प्रतिनिधींनी एकमताने मंजूर केला.
प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीला प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, (MPCC President Nana Patole) विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, (Former CM Prithviraj Chavan) अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते आणि सर्व प्रदेश प्रतिनिधी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुक प्रक्रिया कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यांने व्यवस्थित पार पडला असून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे असे प्रदेश निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून भारत जोडो पदयात्रा (Bharat Jodo) सुरु केली आहे. या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहनही पल्लम राजू यांनी यावेळी केले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर सुरु असलेली भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येणार आहे, या यात्रेच्या तयारीबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.