पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले.(Maharashtra Assembly Monsoon Session) यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी एकमेकाला धक्काबुक्की केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ’पन्नास खोके एकदम ओक्के’ ही घोषणा त्यांना जिव्हारी लागली असून त्यातून हा प्रकार घडला असावा अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“आम्ही सत्तेवर असतानाही विरोधीपक्ष विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. मात्र, आम्ही त्यांना कधी अडवलेले नाही. परंतु आज जाणीवपूर्वक हा प्रकार घडला. महाराष्ट्रात ज्याप्रकारे आमच्या घोषणा दाखवल्या गेल्या, त्याने आपली प्रतिमा मलिन झाल्याची शंका त्यांना आली असावी, ‘चोराच्या मनात चांदणं’ असा हा प्रकार आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही महाविकास आघाडीचे आमदार रोज साडेदहा वाजता विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत असतो, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर मागण्या असतील. त्या विविध घोषणांद्वारे सरकारसमोर मांडत असतो. मात्र, त्यातील ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ ही घोषणा त्यांना चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यातून हा प्रकार घडला”, असेही अजित पवार म्हणाले.