महाविकास आघाडीचं सरकार (MVA govt) कोसळल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस (Shinde Fadnavis govt) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर आता शिंदे गट आणि भाजप यांच्या निशाण्यावर मुंबई महानगर पालिका (BMC) असून पालिकेवर युतीचा भगवा फडकवण्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या आशिष शेलार यांच्या सत्कार कार्यक्रम आणि भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजपच्या नेतेमंडळींनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचं रणशिंग यानिमित्ताने फुंकलं. यावेळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Mumbai BJP President Ashish Shelar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केलेल्या डायलॉगबाजीने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!
देवेंद्र फडणवीसांच्या आधी आशिष शेलार यांचं भाषण झालं. यावेळी शेलार यांनी देवेंद्र फडणवीसांना बिग बी अमिताभ बच्चन यांची उपमा दिली. “देवेंद्र फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती है”, असं आशिष शेलार यांनी म्हणताच उपस्थित भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्याला हसून दाद दिली.
दरम्यान, आशिष शेलार यांच्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांनी देखील याच डायलॉगबाजीचीच री ओढत स्वत: देखील शोले चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. “मघाशी माझा उल्लेख झाला. हे मला अमिताभ बच्चन म्हणतात. माझं शरीर अमजद खानसारखं आहे आणि हे मला अमिताभ बच्चन म्हणतात”, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी फडणवीसांनी कली.
त्याचवेळी मागे बसलेल्या आशिष शेलार यांनी शोले चित्रपटातल्या गब्बर सिंगचा “कितने आदमी थे” हा डायलॉग म्हणताच फडणवीसांनी त्यावर खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. “हो, हे मी विचारू शकतो. कितने आदमी थे? ६५ मे से ५० निकल गए और सबकुछ बदल गया. लेकिन, अब दो ही बचे है..पण त्यांचाही सन्मान आहे. आम्ही विरोधकांचा सन्मानच करतो”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.