नागपूर :
भावनिक होऊन गोविंदांना आरक्षण देण्यासारखे निर्णय घ्यायचे नसतात. मला विम्याचा मुद्दा पटला, मात्र पाच टक्के आरक्षणाची घोषणा योग्य नाही, आले मनात आणि केली घोषणा हे योग्य नाही. अशा प्रकरणात सर्वांशी बोलण्याची गरज असते, मात्र कुणालाही विश्वासात घेण्यात आलं नाही. असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar criticized govt) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवार अमरावतीमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ते नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
गोविंदांना आरक्षण देण्याच्या निर्णयावर अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केला. जेव्हा शिंदे सरकारने (Maharashtra State govt) हा निर्णय घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी दहीहंडी होती. गोविंदांना 5 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा करण्यात आली त्यावेळी मी प्रश्न उपस्थित केले नाहीत. मात्र, दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांचे रेकॉर्ड कसे ठेवणार? त्यांच्या पात्रतेबद्दल माहिती कशी ठेवणार? कुठले निकष काढणार ? अशी विचारणा देखील त्यांनी केली.
येत्या सोमवारी आपण हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करणार आणि आपली भूमिका मांडणार असेही अजित पवार यावेळी म्हणाले. त्यामुळे येत्या काळात हा मुद्दा गाजणार एवढं मात्र नक्की.