आलिया आणि रणबीर कपूरनंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक कपल आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांच्या घरीही नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशाने गरोदरपणातील फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याचं सांगितलं आहे.
पती करणबरोबर बिपाशाने खास फोटोशूट केलं आहे. दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत ग्लॅमरस फोटोशूट करत ही गोड बातमी दिली आहे. या फोटोमध्ये बिपाशा गरोदर असल्याचं दिसत आहे. तसेच तिचं बेबी बम्पही पाहायला मिळत आहे. बिपाशाने फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
बिपाशा म्हणाली, “नवी वेळ, नवी सुरुवात आणि नवा प्रकाश आमच्या आयुष्यामध्ये आला आहे. आम्ही दोघांनीच नव्या आयुष्याला सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही फक्त दोघंच होतं. एकमेकांवरच फक्त खूप प्रेम करायचं हे थोडं अयोग्य वाटलं. म्हणून आता लवकरच आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. लवकरच आमचं बाळ आमच्याबरोबर असेल आणि आमचा आनंद द्विगुणीत होईल.”
बिपाशाने हे सुंदर फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांसह कलाविश्वातील अनेक मंडळींनी या कपलला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशा-करणने आपण आई-बाबा होणार हे जाहिर करताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील दिसून येत आहे.