शिवसेनेतून 50 आमदारांनी बंड केल्यानंतर त्यांचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. शिंदे गटाने भाजपसोबत जात राज्यात सत्ता देखील स्थापन केलेली आहे. आणि मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विराजमान आहेत. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाईला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी देखील झाली आहे.
नुकतीच ट्रायडेंट हॉटेल मधील शिंदे गटाची बैठक संपलेली आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) येत्या 20 तारखेला पुन्हा एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीआधी एकनाथ शिंदे गटाने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे.
या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना मुख्य नेतेपदी निवडण्यात आलेला आहे तर दीपक केसरकर यांची निवड मुख्य प्रवक्ते म्हणून करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख पदाला धक्का देणे मात्र टाळलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही अतिशय महत्त्वाची घडामोड आहे. कोर्टाच्या सुनावणीआधी शिंदे गटानं ही मोठी खेळी खेळलेली आहे. यावर आता शिवसेनेकडून किंवा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे. मुख्य नेते, प्रवक्त्यांसह नेते, उपनेते अशा महत्त्वाच्या नेमणुका देखील शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. आमच्याबरोबर सर्व खासदार आहेत असं मला वाटतं असे देखील दीपक केसरकर म्हणाले आहेत.