TOD Marathi

आसाममध्ये जंगलात वीज पडून 18 हत्तींचा मृत्यू!; वनमंत्री परिमल सुक्लाबैद्या घटनास्थळाचा दौरा करणार

टिओडी मराठी, गुवाहाटी, दि. 14 मे 2021 – आसामच्या नगाव जिल्ह्यातील जंगलामध्ये वीज कोसळून 18 हत्तींचा मृत्यू झाझाल्याचे समोर आले आहे. याबाबत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) अमित सहाय यांनी सांगितले की, कठियाटोली रेंजच्या कुंडोली वन क्षेत्रात एका पहाडावर वीज कोसळून ही दुर्घटना घडली आहे.

अमित सहाय यांनी सांगितले की, या भागात आमची टीम गुरुवारी दुपारी पोहोचू शकली. दोन झुंडींमध्ये हत्तींचे मृतदेह आढळून आले आहेत. यात 14 हत्तींचे मृतदेह डोंगरावर आढळले आहेत तर चार मृतदेह डोंगराच्या खालच्या भागात सापडले आहेत.

आसामचे वनमंत्री परिमल सुक्लाबैद्या यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात आकाशातील वीज कोसळून 18 हत्तींचा मृत्यू झाला आहे, असे समजले आहे. हत्तींच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमार्टेम नंतर समजणार आहे. मी आज घटनास्थळाचा दौरा करणार आहे.

अमित सहाय यांनी सांगितले की, बुधवारी रात्री वीज कोसळून हत्तींचा मृत्यू झाला असून शुक्रवारी पोस्टमार्टेम केल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्टपणे समजणार आहे.