TOD Marathi

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी, भाजपा नेत्या पंकजा मुंडे हे दोघे भाऊ-बहीण राजकारणाच्या रिंगणात सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. मात्र अनेकदा त्यांच्यातलं प्रेमही दिसून येतं. एकमेकांच्या तब्येतीची आपुलकीने चौकशी करणं, कौटुंबिक संकटं, सोहळ्यात प्रेमाने धावून जाणं, अशा प्रसंगांतून भावा-बहिणीतलं प्रेम सतत दिसत असतं.

असाच भावा बहिणी मधला प्रेम दाखवणारा एक प्रसंग नुकताच घडला. निमित्त होतं डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ रुग्णालयाचा लोकार्पण सोहळयाचं.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, डॉ. तात्याराव लहाने, पंकजा मुंडे यांच्यासह इतरही मान्यवर बसले होते. यावेळी धनंजय मुंडे मागून येत असताना पंकजा यांच्या जवळ येताच त्यांनी त्यांच्या डोक्यात प्रेमाने टोला मारला आणि क्षणारर्धात उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं आणि हा प्रसंग चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

या कार्यक्रमात बोलत असताना पंकजा मुंडे यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांचा विशेष उल्लेख केला, सोबतच धनंजय मुंडे यांना टोलाही लगावला. “ज्यांच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस कुणाकडेच नसतील असे शरद पवार, ज्यांच्या लेन्सेस सगळ्यांना सूट करतील असे बाळासाहेब थोरात, जे नवीन दृष्टी देतील असे आदित्य ठाकरे, सोफिस्टिकेटेड लेन्सेस अमित देशमुख तसंच मुंडे महाजन मैत्रीतून आणि आता राष्ट्रवादीच्या, शरद पवारांच्या लेन्सेसमधून दिसणारे बंधू धनंजय मुंडे” असा उल्लेख केला.

बरेच दिवसांनी मुंडे बंधू-भगिनी एका मंचावर आल्याचे पाहायला मिळाले.