TOD Marathi

शिवसंग्रामचे नेते, माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete Passes away) यांचे पहाटेच्या सुमारास अपघातात दुःखद निधन झाले. राजकीय विश्वासह सामाजिक विश्वातही शोककळा पसरली कुठलिही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी नेतृत्व म्हणून ओळख मिळवली.

त्यांच्या अपघाती निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (NCP Chief Sharad Pawar writes about Vinayak Mete)

दिवसाची सुरुवात विनायकराव मेटे यांच्या अतिशय धक्कादायक अशा अपघाती निधनाच्या बातमीने झाली. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये, विशेषतः मराठवाड्यामध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व अत्यंत कष्टाने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकसित केलेला नेता असा विनायकरावांचा परिचय महाराष्ट्राला होता, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

ते राजकीय कार्यकर्ते कमी पण सामाजिक कार्यकर्ते अधिक होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असेल किंवा नव्या पिढीच्या शैक्षणिक सवलतींचा प्रश्न असेल अशा सगळ्या कामांमध्ये अत्यंत बारकाईने व अभ्यासूपणाने व्यक्त होणारे ते व्यक्तिमत्व होते. राज्य सरकार वा अन्य संस्था सुसंवाद ठेवण्याची त्यांची भूमिका होती.

शिवछत्रपतींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईच्या समुद्रामध्ये व्हावे यासाठी त्यांनी कष्ट घेतले व अनेकांना आपली आग्रही भूमिका पटवून देण्याची खबरदारी घेतली. आजच्या आकस्मिक अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातल्या एका मोठ्या सामाजिक नेतृत्वाला आज आपण मुकलो. मी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने या दुःखामध्ये सहभागी आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते आमचे सहकारी होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी काम केले. नंतर स्वतःचा पक्ष काढण्याची भूमिका त्यांनी घेतली. अशा एका जीवाभावाच्या सहकाऱ्याला आम्ही मुकलो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि हजारो कार्यकर्त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली! अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.