TOD Marathi

शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे पहाटे अपघाती निधन झाले. या निधनानंतर राजकीय तसेच सामाजिक वर्तुळातील मान्यवरांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केले आहेत. (Shivsena Chief Uddhav Thackeray)

मराठा समाजातील बांधवाना भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झगडणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे अकाली अपघाती झालेले निधन मनाला वेदना देणारे आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयास या दुःखद प्रसंगी मनाला धीर देण्यास बळ देवो. अशा शोकभावना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

विनायकरावांना गेली अनेक वर्ष जवळून पाहण्याचा योग आला, त्यांचा संघर्ष त्यांच्या समाजासाठी तर असायचाच पण त्याच सोबत तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची भूमिका असायची, भाजपसोबत असताना त्यांची गोपीनाथरावांसोबत (Gopinath Munde) सतत भेट व्हायची, आपला संघर्ष हा मराठा समाजाला एक दिवस न्याय मिळवून देईल याबाबत त्यांना खात्री होती, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून नेहमी त्यांच्याशी संवाद होत असे, त्यांची तळमळ आणि शोषितांना न्याय देण्याचा आग्रह, धडपड पाहताना नेहमी त्यांचे कौतुक वाटायचे.

अधिवेशन काळात विधिमंडळाच्या आवारात होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये त्यांचा आग्रह कायम विधानपरिषदेत मराठा आरक्षणाबाबत विशेष चर्चा घेण्याचा असे, त्यांच्या अशा अकाली निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.