मुंबई : ठाकरे सरकारने आणि खासकरुन उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दी बा पाटील यांचं नाव देण्यासंबंधी घेतलेले निर्णय रद्द केले असल्याचं खरं असेल, तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
राऊत म्हणाले की, औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी स्थगिती दिली.
हेच भाजपावाले औरंगाबादचं संभाजीनगर कधी करत आहात असं विचारत होते. उस्मानाबादसंबंधीही तीच भूमिका होती. दी बा पाटील यांच्या नावासाठीही यांनीच मोर्चे काढले होते. उद्धव ठाकरेंनी केंद्राची तसंच कोणाचीही पर्वा न करता हिंमतीने एका हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर करत नामांतराचा निर्णय घेतला होता, असं राऊत यावेळेस म्हणाले.
जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत.हे सरकार बेकायदेशीर, घटनाबाह्य आहे. या सरकारला निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही, कारण याबद्दलचा निर्णय़ सुप्रीम कोर्टात व्हायचा आहे, अशी मागणीही त्यांनी यावेळेस केली.
दरम्यान आरेचा विषय तुमचा जिव्हाळ्याचा होता हे समजू शकतो. त्यासाठी आम्ही संघर्ष करु. पण औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? स्थगिती देण्यासाठी औरंगजेब तुमचा कोण लागतो? निजामाच्या काळातील उस्मान कोण लागतो? लोकभावनेचा आदर म्हणून दी बा पाटील यांचं नाव दिलं होतं, असा खोचक टोलाही राउतानी यावेळेस शिंदे सरकारला लगावला.