TOD Marathi

मुंबई : ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह 40 आमदार आणि 12 खासदारही आनंदी असतील अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट ( MLA Sanjay Raut ) यांनी व्यक्त केली. राऊत यांच्याकडे प्रखर वाणी आणि लेखणीवर प्रभुत्व आहे, त्याआधारे त्यांनी स्वत: ची सुटका करून घ्यावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आमचं पोस्टमार्टेम करायला निघालेल्या संजय राऊत यांचं पोस्टमार्टेम तपास यंत्रणांनी सुरू केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले.

आज सकाळी, शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut ) यांच्या घरी ईडी (ED ) पथकाने छापा मारला. ईडीकडून संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले की, राऊत यांच्या भोंग्यामुळेच शिवसेनेत फूट पडली. राऊत हे प्रवक्ता होते, मास लीडर नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईने मोठा क्षोभ उसळून येणार नाही असेही शिरसाट यांनी म्हटले. ईडीची कारवाई कायद्यानुसार होत असल्याचेही त्यांनी म्हटले. राऊत निर्दोष असतील तर त्यांची सुटका होईल असेही शिरसाट यांनी म्हटले. अर्जुन खोतकर यांच्याबाबत विचारले असता खोतकर यांचा विषय वेगळा आहे. त्यांनी आपल्या भावना वेगळ्या पद्धतीने मांडल्या असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊ नये असेही शिरसाठ यांनी म्हटले. बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार आम्हाला असून आम्ही पक्षासाठी 40 वर्ष काम केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले. नोकरी करता-करता नेते होणे सोपं नाही, याची जाणीव आता राऊतांना होईल असा टोलाही त्यांनी लगावला.