TOD Marathi

 

मुंबई:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर १ जूनला शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी राज ठाकरे हे मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या पायाच्या जुन्या व्याधीने डोके वर काढले होते. राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पायाचे दुखणे बळावल्याने राज ठाकरे यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया होणार असल्याचे निश्चित झाले होते.

राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मनसेचा अयोध्या दौरा आणि मशिदींवरील भोग्यांबाबतचे आंदोलन थंडावण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच पुणे येथे झालेल्या सभेत आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती. आपण आरोग्यासंदर्भातील पथ्यपाणी खूप गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. मात्र, आपण आज करु, उद्या करू, या नादात कायम टाळाटाळ करत राहतो. मला सध्या त्रास होत असल्यामुळे मला या सगळ्याची जाणीव होत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

मी खरंतर बॅडमिंटन खेळणार, क्रिकेट खेळणारा, टेनिस खेळणारा आहे. पण सध्या मला कोणताही व्यायाम करता येत नाहीये. मला कुठलाही खेळ खेळता येत नाही. त्यामुळे मी त्या गोष्टीला विटलो आणि म्हणालो एकदाचं ऑपरेशन करून टाकू. अर्थात त्यानंतर मला फार धावता येईल, असंही नाहीये. पण त्यानंतर सगळं सुरळीत होईल, असे डॉक्टरांचे मत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर 1 जूनला लीलावती रुग्णालयात ‘हीप बोन’ संबंधी स्वस्त शस्त्रक्रिया पार पडणार आहे.