TOD Marathi

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारायचे सोडत नाहीत आणि माझी पत्नी अमृता नको त्या गोष्टींवर बोलणं सोडत नाही, अशी मिश्किल टिपण्णी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  पत्रकारांशी संवाद साधतना त्यांनी अनेक राजकीय कोपरखळ्या शेअर केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यादरम्यानच्या शाब्दिक फैरींवर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले की,  अमृता फडणवीस यांच्या गायनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला होता. “राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, असं मला वाटत होतं,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला .

तसेच  ‘मला वाटलं होतं, अब्जाधिश फक्त आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. असं म्हणत  अमृता फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं.