TOD Marathi

वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्रात चांगलंच वातावरण तापलं आणि ते अद्यापही थंड होताना दिसत नाही. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde Devendra Fadnavis) सरकारवर टीका केली तर सरकारच्या वतीने महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सातत्याने या मुद्द्यावरून सरकारला निशाणावर धरत आहेत. याप्रकरणी त्यांनी तळेगावात मोर्चा देखील काढला होता.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या या जनआक्रोश मोर्चाला पाठिंबा दिला आहे. पुण्यातील वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढत वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीचे सरकार असते तर राज्यात वेदांताचा प्रकल्प काहीही करून आणलाच असता, आणि या ठिकाणी आक्रोश मोर्चाच्या जागी जल्लोष मोर्चा झाला असता, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी बोलताना केलं होतं. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांना समर्थन दिलं आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे लोकांमध्ये जाऊन वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे वेदांताबद्दल हे केवळ बोलत नाही तर ते पुरावेही देत आहेत आणि ते बघितल्यानंतर असं दिसते की राज्यातल्या बऱ्याच कंपन्या गुजरात आणि इतर राज्यात जात आहेत. योगायोग म्हणजे डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभेची निवडणूक आहे, त्यानंतर कर्नाटकची आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रात निवडणुका आहेत.

त्यामुळे या सर्व गोष्टी लोकांच्या हितासाठी आहेत की राजकारणासाठी आहेत, असा प्रश्न पडतो. जर हे राजकारणासाठी सुरू असेल तर हे महाराष्ट्र राज्याच्या हिताचे राजकारण आहे की दुसऱ्या राज्याच्या हिताचे आहे हे बघितलं पाहिजे, असंही रोहीत पवार म्हणाले.