गुजरात विकास मॉडेल अभ्यासासाठी राज्याचे वनमंत्री आणि उद्योगमंत्री गुजरातला जातात एवढी मोठी नामुष्की शिंदे-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्रावर आली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. (NCP Spokesperson Mahesh Tapase criticized Govenment)
ईडी सरकारचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना महाराष्ट्रात (Sudhir Mungantiwar and Uday Samant) गुंतवणूक कशी आणायची याचा अभ्यास करण्यासाठी गुजरातला जावं लागतं याच्यासारखे दुर्दैवी सरकार महाराष्ट्रात असूच शकत नाही, असा टोला महेश तपासे यांनी लगावला.
महाराष्ट्र हा गुंतवणूकदारांसाठी अव्वल नंबर राहिला आहे. देशात महाराष्ट्राचे आगळेवेगळे महत्त्व आहे. त्याच महाराष्ट्रात ईडीसरकार आल्यावर फॉक्सकॉनसारखा प्रकल्प, महत्वाची कार्यालये गुजरात पळवून नेली जातात ही शोकांतिका आहे, असेही महेश तपासे म्हणाले.
गुजरात हे सगळे नेत असताना राज्यातील भाजप नेते हतबलतेने बघत आहेत. राज्यातील नागरिकांना, उद्योगपतींना महाराष्ट्रावर विश्वास आहे. मात्र सरकारची विश्वासार्हता काय असा प्रश्न उद्योगजगतातील लोकांच्या मनात निर्माण झाला आहे, असे तपासे यांनी सांगितले.