TOD Marathi

टिओडी मराठी, वसई, दि. २२ ऑगस्ट २०२१ – महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या वतीनेकोकणामध्ये गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार्‍या एसटी सेवेला यंदाही चाकरमान्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. महिनाभरात कोकणामध्ये जाण्यासाठीच्या दोनशेहून अधिक एसटीबसचे आरक्षण पूर्ण झाले आहे.

यंदा करोनाच्या सर्व नियमांचे पालन करून विशेष एसटी बस सोडण्यात येणार आहेत. त्यानुसार पालघर एसटी महामंडळानेही विशेष बसेस सोडण्याच्या संदर्भात नियोजन सुरू केलं आहे.

वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारातून या बसेस सोडण्यात येणार आहेत. १६ जुलैपासून आगाऊ आरक्षण सेवा एसटी महामंडळाच्या वतीने सुरू केली आहे.

अवघ्या महिन्यात सुमारे २१५ बसेसचे आरक्षण झाले आहे. यात १० शिवशाही बसेसचाही समावेश आहे, असे पालघर विभाग एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

सन २०१९ मध्ये २८० बसेस कोकणात सोडल्या होत्या. यंदा नागरिकांचा प्रतिसाद पाहता बसेसचे आरक्षण हे ३३० पर्यंत जाणार आहे, असा अंदाज पालघर एसटी विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केलाय.

यंदा कोकणामध्ये जाणार्‍या नागरिकांनी एसटी सेवेला उत्तम प्रतिसाद दिला आहे. ज्या प्रमाणे आरक्षण होत आहेत, तशा बसेस वाढविण्यात येत आहेत. अधिकाधिक नागरिकांना चांगली सेवा देण्याचा एसटीचा प्रयत्न सुरू आहे, असे पालघर एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी सांगितले आहे.