TOD Marathi

पुणे:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार होती. त्याच सभेच्या नियोजनासाठी आणि मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी राज ठाकरे २ दिवसीय पुणे दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान त्यांनी निवडक मनसे पदाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर राज ठाकरेंनी सायंकाळच्या सुमारास पुस्तकं खरेदी केली. सभेच्या नियोजनासाठी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मात्र पावसाच्या शक्यतेने त्यांनी आपली सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेत ही सभा पुढच्या आठवड्यात इनडोअर घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हा निर्णय घेऊन राज ठाकरे मुंबईकडे रवाना देखील झाले. तत्पूर्वी त्यांनी मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना भेटीसाठी वेळ दिली होती. मात्र वसंत मोरे यांना न भेटताच राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले.

राज ठाकरेंनी भोंगेविरोधी भूमिका घेतली तेव्हापासून वसंत मोरे पक्षात नाराज आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वेळोवेळी आपली नाराजी बोलवून दाखवली. पक्षातील महत्त्वाच्या बैठकांना त्यांना आमंत्रण दिलं जात नाही तर कधी त्यांचं नावच कार्यक्रम पत्रिकेत छापलं जात नाही. वसंत मोरे यांना काहीसं बाजूला सारण्याचं काम पक्षात होत आहे, असा आरोप स्वत: वसंत मोरे यांनी केला आहे. त्यातच राज ठाकरेंनी वसंत मोरे यांना वेळ देऊन त्यांना न भेटताच राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आलं आहे.

राज ठाकरे हे १७ मे पासून पुणे दौऱ्यावर होते. अयोध्या दौऱ्याच्या अगोदर राज ठाकरे २१ मे ला पुण्यात सभा घेणार होते. त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. जागाही ठरवण्यात आली होती. मात्र, पावसाच्या शक्यतेने ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पुढच्या आठवड्यात इनडोअर सभा घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.