बारामती लोकसभा मतदारसंघात कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवायचा अशी भाजपची तयारी आहे. यासाठी भाजपने जोरदार व्यूहरचना करत कंबर कसली आहे. या भागातील लोकांना नवा पर्याय देण्यासाठी आम्ही या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत असल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे आणि याच माध्यमातून भाजपाचे मिशन बारामती सुरू झालेलं आहे. मात्र, भाजपचे हे मिशन बारामती सुरू असताना दुसरीकडे शहराच्या विकासाच्या मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी तब्बल 38 खासदारांचे संसदीय सहाय्यक बारामती दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीस्थित पॉलिसी रिसर्च स्टडी या संस्थेचे 38 खासदारांचे संसदीय सहाय्यक विकासाचे बारामती मॉडेल अभ्यासण्यासाठी दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर आले आहेत.
खासदारांच्या संसदीय सहाय्यकांनी काल बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र, डेअरी, इंनक्युबेशन सेंटर, बारामती नगरपालिका यांची माहिती घेत पाहणी केली. आज हे शिस्टमंडळ बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, विद्या प्रतिष्ठान या संस्थांना भेटी देणार आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ), विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ), खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्या माध्यमातून झालेल्या विकासाच्या नोंदी देखील घेणार आहेत.
देशातील खासदारांना त्यांच्या कामकाजात विविध प्रकारची मदत व्हावी, या उद्देशाने पॉलिसी रिसर्च स्टडी या संस्थेच्या वतीने देशभरातून काही युवकांची नियुक्ती केली जाते. परीक्षा आणि मुलाखतीद्वारे वेगळे कौशल्य असलेल्या 21 ते 25 वर्ष वयोगटातील युवकांना खासदारांसमवेत दिल्लीत वर्षभर काम करण्याची संधी मिळते. संसदेचे पावसाळी अधिवेशन ते बजेट अधिवेशनापर्यंत हे युवक खासदारांच्या कामात त्यांना मदत करत असतात. त्यासोबतच संसदेत उपस्थित करायचे प्रश्न व त्यांची भाषणं लिहिणं त्यांना इतर कामकाजात मदत करणं, अशा स्वरूपाची कामं युवकांकडून केली जातात.
दरम्यान, बारामतीत विकास कसा झाला आहे ते पाहण्याच्या उद्देशाने आम्ही बारामतीत आलो आहोत. या दौऱ्याचा अहवाल आम्ही ज्या 38 खासदारांसोबत काम करत आहोत त्यांना सादर करणार आहोत अशी माहिती देखील या संसदीय सहाय्यकांनी दिली.
त्यामुळे बारामती लोकसभा कुठल्याही परिस्थितीत मिळवायचीच असं वाटणाऱ्या भाजपासाठी हा गड सर करणं कितपत सोपं असेल हा एक प्रश्नच आहे.