TOD Marathi

राष्ट्रवादी काँग्रेसने साजरा केला 23 वा वर्धापन दिन

संबंधित बातम्या

No Post Found

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन (Nationalist Congress Party celebrates 23rd anniversary) आज साजरा होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी भवन, मुंबई (Rashtrawadi Bhavan Mumbai) येथे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या एकजुटीने पक्षाला मिळालेल्या उभारीबद्दल जयंत पाटील यांनी सर्वांचे यावेळी आभार मानले. आपला पक्ष तेवीस वर्षांचा झाला आहे. आपल्या पक्षामध्ये महाराष्ट्रातील नव्या पिढीला भविष्यातील आशा दिसत आहे. अनेक तरूण पक्षात काम करण्यास इच्छुक आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम सुरु आहे, हे पक्ष वाढण्याचे एकमेव कारण आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

तुम्हा सर्वांचे कष्ट, प्रयत्न, जिद्द यातूनच आपला पक्ष इथपर्यंत आला आहे याची आम्हा सर्वांना जाणीव आहे. हा पक्ष आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करायचा आहे. यासाठी एकसंधपणे प्रयत्न करूया, असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी सर्व कार्यकर्त्यांना केले.

 

पुढे जयंत पाटील यांनी २३ वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करताना राज्यात पक्षाच्या ताकदीवर आपली सत्ता स्थापन होईल असा निर्धार केला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. राज्यातील सर्व घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आपल्याकडून होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच आगामी काळात होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव व कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगले चित्र निर्माण करेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छनग भुजबळ (chhagan bhujbal) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्ष स्थापन झाल्यावर प्रांताध्यक्ष होण्याचा मान सर्वप्रथम मला मिळाला. राज्यात पक्षाची कोणतीही बांधणी नसताना काँग्रेस खालोखाल क्रमांक दोनचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरला. तेव्हापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील गोरगरीब जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण काम करत आहोत, असे भुजबळ म्हणाले. शरद पवारांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून राज्यात आरक्षण मिळवून दिले. या आरक्षणाला नख लावण्याचे काम काही शक्तींकडून होत आहे. मात्र त्याविरोधात आपण सक्षमपणाने लढा देतोय, अशी खात्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोणत्याही व्यक्तीच्या अथवा पक्षाच्या राजकीय जीवनात २३ वर्ष प्रवास करणे व आपला प्रभाव टिकून ठेवणे महत्त्वाचे आहे. आता खऱ्या अर्थाने आपला पक्ष युवा जीवनात प्रवेश करत आहे. या प्रवासात शरद पवार यांनी आपला राष्ट्रीय प्रभाव राखून ठेवला आहे. आपल्याला अजून खूप काम करायचे आहे. राजकीय पक्षाला कोणत्याही वर्षाची मर्यादा नसते. आपल्याला सर्व मर्यादा ओलांडून हा पक्ष टिकवायचा आहे, वाढवायचा आहे. आपल्याला पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडायची आहे, असे खडसे म्हणाले.

या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार शेखर निकम, कोषाध्यक्ष हेमंत टकले तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.