टिओडी मराठी, दि. 17 जून 2021 – आफ्रिकेच्या बोट्सवाना या देशात उत्खनन करताना जगातील तिसरा मोठा हिरा सापडला आहे. डेब्सवाना कंपनीला या हिऱ्याचा शोध लागला आहे. सुमारे 1,098 कॅरेटचा सर्वोच्च गुणवत्तेचा हा हिरा आहे. त्यामुळे कोरोना काळात या हिऱ्याचा शोध त्यांच्या देशासाठी आशेचा किरण आहे, असे बोलले जात आहे.
डेब्सवाना कंपनीला उत्खनन करताना या हिऱ्याचा शोध लागलाय. 1 जून रोजी हा हिरा देशाचे राष्ट्रपती मोकगवेत्सी मसीसी यांना दाखविण्यात आला आहे. डेब्सवानाचे व्यवस्थापकीय संचालक लिनेट आर्मस्ट्राँग हिऱ्याबाबत माहिती देताना सांगितले की, गुणवत्तेच्या तुलनेत जगातील हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा आहे.
हिरा उद्योग व बोट्सवानासाठी हा दुर्मिळ आणि विलक्षण दगड महत्त्वाचा ठरणार आहे. हा हिरा संघर्ष करत असलेल्या त्यांच्या देशासाठी आशेचा नवा किरण घेऊन आलाय. मात्र, या हिऱ्याला अद्याप कुठलेही नाव दिलेले नाही.
हिऱ्याचे वर्णन करताना डेब्सवाना कंपनीने सांगितले की, हा हिरा 1,098 कॅरेटचा आहे. हिरा 73 मिमी लांब आणि 52 मिमी रुंद आहे. बोट्सवानाच्या इतिहासात हा सर्वात मोठा शोध आहे. बोट्सवाना सरकार आणि जगातील सर्वात मोठी डायमंड कंपनी डी बीयर्स यांनी संयुक्तपणे डेब्सवाना कंपनी तयार केलीय.
याअगोदर 1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेत जगातील सगळ्यात मोठा हिरा सापडला होता. तो साधारणत: 3,106 कॅरेटचा होता. 2015 मध्ये ईशान्य बोट्सवानामध्ये जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा सापडला, जो टेनिस बॉलच्या आकारा सारखा होता. हा हिरा 1109 कॅरेटचा होता त्याला ‘लेसेडी ला रोना’ असं नाव दिलं होतं.
आफ्रिकेतील सर्वात मोठा हिरा उत्पादक देश म्हणून बोट्सवानाला ओळखतात. कोरोनामुळे देश आर्थिक संकटात असताना हा हिरा सापडल्याने बोट्सवाना सरकारला दिलासा मिळालाय. डेब्सवाना कंपनी आपल्या हिऱ्यांच्या 80 टक्के उत्पन्नाची विक्री सरकारला करतेय.