विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत तूर्तास कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. (Supreme court orders to assembly speaker) यामुळे शिंदे गटातील १६ आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांकडे दाखल याचिकांवर सुनावणीसाठी विनंती केली होती. ही विनंती कोर्टाने नाकारली. दरम्यान सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे प्रकरण सोपवावं लागेल असं सांगतानाच त्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचंही म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाकडून हे अपेक्षित नाही असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Shivsena MP Arvind Sawant on decision of Supreme Court)
अरविंद सावंत म्हणाले की, “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं आहे त्याच्या मुळावर घाव घालण्याचं जे काम सुरु आहे त्याची जास्त चिंता वाटत आहे. उद्धव ठाकरे यांनीही तीच चिंता व्यक्त केली आहे”. “कायद्याची पायमल्ली होत असताना सुप्रीम कोर्ट आणि सगळेच शांत आहेत. अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये सांगत सुप्रीम कोर्टाने नक्की कोणाला दिलासा दिला आहे?,” असा प्रश्नही अरविंद सावंत यांनी केला आहे.
“अध्यक्षांनी आमच्या बाजूने निर्णय दिला असता का हा वेगळा प्रश्न आहे. पण सरकार तसंच राहणार का? बेकायदेशीरपणे निर्माण झालेल्या सरकारला ज्या प्रकारे संरक्षण दिलं जात आहे आणि वेळकाढूपणा केला जात आहे, न्याय देण्यास उशीर करणं हे सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित नाही. आम्ही सुप्रीम कोर्टाकडे एकमेव आशा म्हणून पाहत आहोत. आमच्याकडे शिवसेना म्हणून पाहू नका, पण देशाच्या संविधानाच्या पायावर घाव घातला जात आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये असंच घडलं होतं,” असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं.
“गोव्यात काय सुरु आहे हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. (Goa Politics) हे सत्तापिसासू लोक आहेत. देशात सध्या इतके प्रश्न आहेत. गॅसचा भाव वाढलेला असतानाही आम्ही शांत आहोत. घटनेला पायदळी तुडवलं जात आहे याचं दु:ख आहे,” असं अरविंद सावंत यांनी सांगितलं.
“मुख्यमंत्र्यांनी आमच्या संपर्कात असलेल्यांची नावं पाठवून देतो असं सांगितलं होतं. त्यांनी त्या १४ जणांची नावं द्यावीत,” असं आव्हान अरविंद सावंत यांनी यावेळी दिलं. पक्षप्रमुखांनी आम्हाला कधीच मत मांडण्यापासून रोखलेलं नाही असंही सांगत अरविंद सावंत यांनी आरोप फेटाळले. (Arvind Sawant challaned Shinde group)
सुप्रीम कोर्टात काय घडलं?
सुप्रीम कोर्टात आज आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तसंच इतर याचिकांवर सुनावणी होणार होती. मात्र, आज ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्या वतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली. यावेळी अध्यक्षांकडून उद्या अपात्रतेवर सुनावणी होणार असल्याची माहिती कपिल सिब्बल यांनी यावेळी दिली. कोर्टात सुनावणी झाली नाही तर अध्यक्ष याचिका फेटाळून लावतील अशी शक्यता कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली. यानतंर सुप्रीम कोर्टाने सुनावणी होईपर्यंत अध्यक्षांनी कोणतीही कारवाई करु नये असे निर्देश दिले.