राज्य सरकार कोसळल्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिल्यांदाच भाजपसोबत जात सत्तेत सामील होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्त्वाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोणताही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र गुरुवारी सकाळी एकनाथ शिंदे यांच्याकडून ट्विट करुन या सगळ्यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. (Eknath Shinde tweet)
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलय की, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
येत्या एक दोन दिवसांत राज्यात भाजपकडून सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. त्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांमध्ये सत्तेचे वाटप कसे होणार, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत पुढील रणनीती ठरवली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गटाला भाजपकडून ६ कॅबिनेट मंत्रीपद आणि ६ राज्यमंत्री पदं मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.