TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 24 ऑगस्ट 2021 – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्याचे राजकारण तापलं आहे. नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुंबईतील दादर टीटी परिसरात बॅनरबाजी पाहायला मिळाली. शिवेसेनेने नारायण राणे यांचा कोंबडी चोर असा उल्लेख करत त्यांना डिवचणारा बॅनर लावला होता. परंतु पोलिसांनी सध्या हे बॅनर काढून टाकलं आहे. शिवसेनेनं लावलेलं हे बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राज्यात ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नारायण राणेंविरोधात निदर्शनं केली आहेत. मुंबईतील जुहू येथे नारायण राणेंच्या निवासस्थानाबाहेर देखील तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. याशिवाय अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर जमून नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी केली.

नारायण राणे यांचं वादग्रस्त विधान –
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेवेळी काल महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे यांनी जोरदार टीका केला. मात्र, टीका करण्याच्या नादात राणे यांनी वादग्रस्त विधान केले.

त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच लावली असती, असे नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महागात पडणार आहे. नारायण राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झालेत.