TOD Marathi

मविआ सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी बंडाचा झेंडा फड़कवला. त्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली असून या पार्श्वभूमीवर आता भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवलं आहे. (BJP writes a letter to Governor) विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाने पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे या वादात उडी घेतली आणि राजकीय घडामोडींना वेग आलाय.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, यांनी राज्यपाल कोश्यारी यांना भाजपच्या वतीने हे पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये भाजपाने महाविकास आघाडी सरकार राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्याने घाईघाईत शासन आदेश जारी करत असून यासंदर्भात संशय घेण्यास वाव असल्याचं म्हटलंय. सोबतच ज्या वेगाने शासन आदेश जारी केले जात आहेत ते पाहता यामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावं अशीही मागणी भाजपाने केली आहे.

सध्याची राज्यातील स्थिती पाहता राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी भाजपाने केली आहे. अस्थिर स्थिती पाहून महाविकास आघाडी सरकार घाईघाईत निर्णय घेत आहे असा आरोप भाजपाने राज्यपालांना पाठवलेल्या या पत्रामधून केलाय. घाईघाईनं शासन आदेश जारी होत आहेत. राज्यातील राजकीय स्थिती तीन दिवसांमध्ये अत्यंत अस्थिरतेची झाली आहे. दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारने १६० हून अधिक शासन आदेश काढलेले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली काढलेले जीआर संशय वाढवणारे आहेत, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.