टिओडी मराठी, दि. 1 ऑगस्ट 2021 – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कृतीशील साहित्यिक होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिलं आहे. आपल्या लेखणी, शाहिरीवाणीच्या बळावर संयुक्त महाराष्ट्राचा, गोवामुक्तीचा लढा यशस्वी करुन दाखवला. तसेच शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या श्रमशक्तीवर जगाचा रहाटगाडा सुरु आहे, असा क्रांतीकारी विचार अण्णा भाऊ साठे यांनी दिला आहे, असे प्रतिपादन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केलं.
पवार म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज याचं जीवनचरित्र सामान्य माणसापर्यंत नेले. दुर्बल, वंचित, उपेक्षित समाजबांधवांचा वास्तववादी जीवनसंघर्ष साहित्यातून जगासमोर आणलं.
शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या श्रमशक्तीवरच या जगाचा रहाटगाडा सुरु असल्याचा क्रांतिकारी विचार अण्णा भाऊ साठे यांनी दिला. वास्तववादी, काळजाचा ठाव घेणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीनं, शाहिरीनं महाराष्ट्राचं साहित्यिक, सांस्कृतिक विश्व खऱ्या अर्थानं समृद्ध केले.
कथा, नाटक, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवासवर्णन असे साहित्यातले प्रकार त्यांनी लीलया अण्णा भाऊ साठे यांनी हाताळले.
औपचारिक शिक्षण नसताना केवळ अक्षरओळख असलेल्या अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आज अनेक विद्यापीठांत अभ्यासले जाते. त्यांच्या नावाने विद्यापीठांत अध्यासन स्थापन केले आहे.
हा अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा, विचारांचा गौरव आहे. मी अण्णा भाऊ साठे यांच्या अलौकिक कार्याबद्दल, राष्ट्र व लोकसेवबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे याना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.