TOD Marathi

तिरंदाज Deepika Kumari चा नेम चुकला, Olympics स्पर्धेतून बाहेर ; दडपण घेतल्याने झाला पराभव

टिओडी मराठी, टोकियो, दि. 30 जुलै 2021 – भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात पुन्हा अपयश आलं आहे. दीपिकाचा नेम चुकल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिचे या स्पर्धांमधील आव्हान संपुष्टात आले.

दीपिकाला २०१२ लंडन आणि २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे यंदा कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी तिच्यावर दडपण होते.

तिने मागील महिन्यामध्ये तिरंदाजी वर्ल्डकपमध्ये तीन सुवर्णपदकांची कमाई करताना जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली होती. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. परंतु, तिला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.

तिरंदाजी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये दीपिकाला कोरियाच्या सान आनने ६-० असे सरळ सेटमध्ये पराभूत केलं. सानने या सामन्याच्या सुरुवातीपासून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केलं. तिने पहिला सेट ३०-२७ असा जिंकला होता. तर सानने पहिल्या सेटमध्ये तिन्ही बाण अचूकपणे १० गुणांवर मारले.

तर दुसऱ्या सेटमध्ये दीपिका पुनरागमन करेल, अशी आशा होती. तिने पहिला बाण १० गुणांवर मारला होता. यानंतरच्या दोन प्रयत्नांमध्ये मात्र तिला ७-७ गुण मिळवता आले.

तर, सानने एकूण २६ गुण मिळवले, त्यामुळे दीपिकाने दुसरा सेट २४-२६ अशा गुणांनी गमावला. तर तिसऱ्या सेटमध्येही दीपिकावर आणखी दडपण आल्यामुळे चांगला खेळ करू शकली नाही. तिने हा सेटही २४-२६ असा गुणांनी गमावला आणि तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.