महाराष्ट्रातील फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची माहिती आहे. आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील हा एक महत्वाचा प्रकल्प होता ज्याने रोजगार निर्मिती होणार होती. मात्र, हा प्रकल्प गुजरात राज्यात जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
१.५८ लाख कोटींचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातलाच कसा गेला? रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला आणि महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का ? असं प्रश्न विचारात बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.
फॉक्सकॉन महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रु. गुंतवणूक करणार होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ९०% चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरातला कसा गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे.
महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पहिल्या पसंतीचे राज्य आहे. मविआ सरकारने अडीच वर्षांच्या काळात मोठी गुंतवणूक राज्यात आणली व त्यातून राज्यातील लाखो तरुणांच्या हाताला काम दिले. परंतु मविआ सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला? असा प्रश्नदेखील बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची कोणतीच माहिती राज्य सरकारला समजली नाही का? हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काय प्रयत्न केले?
मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी भाजप व केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आले आहे. फडणवीस सरकार राज्यात असताना मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गुजरातला हलवण्यात आले. अनेक महत्वाचे प्रकल्प व कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली.
बुलेट ट्रेनची गरज नसतानाही महाराष्ट्राच्या माथी हा प्रकल्प लादला गेला. आता पुन्हा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत याचे गांभीर्य या सरकारला नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सत्कार सोहळे व देवदर्शनात व्यस्त आहेत. त्यांनी थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता. आता गुंतवणूकही गेली आणि लाखो रोजगारही गेले. हे का झाले? याचा खुलासा सरकारने करावा, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.