TOD Marathi

केंद्रीय मंत्री, भाजप नेत्या स्मृती इराणी काल पुणे दौऱ्यावर होत्या. त्यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात काल जोरदार राडा झाला. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी वैशाली नागवडे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वैशाली नागवडेंसह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या काही पुरूष नेत्यांकडून मारहाण झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, चूक कोणाची आहे हे तपासण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. भाजपची चूक असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणं ही आक्षेपार्ह गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.