TOD Marathi

स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी कुठेही तडजोड केली नाही. पुरंदरचा तह अपमानकारक होता, परंतु, तो तह त्यांनी धुडकावून लावला. जिथे आपल्यावर बंधनं घातली जातात तिथे थांबायचं नसतं, अशी महाराजांची शिकवण आहे. शिवाजी महाराज यांनी देखील संघर्ष केला, परकियांशी केला तसा स्वकीयांशी देखील त्यांना संघर्ष करावा लागला. यातूनच त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. हेच शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपल्याला पुन्हा एकदा उभं करायचं आहे, असा निर्धार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी रायगडावरून व्यक्त केला.

किल्ले रायगडावर आज 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala) संपन्न झाला, यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या शिवभक्तांना संबोधित केले. गेली दोन वर्षे कोरोनामूळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा दोन वर्षानंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

मी आज काही राजकीय बोलणार नाही असे स्पष्ट करत संभाजीराजे यांनी यावेळी कोणाचेही नाव घेतले नाही. परंतु, अनेक ऐतिहासिक दाखले देत राज्यसभा निवडणूकीवरुन आणि रायगडावरील सोयी-सुविधांवरुन राज्य सरकारवर नाव न घेता टीका केली.

“मागील दोन वर्षात कोरोनामुळे शिवराज्याभिषेक सोहळा हा साधेपणाने झाला. त्यावेळी मी रायगडावर येऊ नका अशी हाक दिली होती आणि तुम्ही ती एकली, हा छत्रपतींबद्दलचा विश्वास आहे, हे प्रेम आहे. रायगडावर कोणतीही सोय नसताना देखील शिवभक्त राज्याभिषेक सोहळ्याला हजर असतात. त्यामुळे माझा सरकारला प्रश्न आहे की, तुम्ही शिवभक्तांसाठी काय केलं? असा प्रश्नही उपस्थित केला. एसटी आम्हीच आणायची, पाणी आम्हीच आणायचं. तर सोय होत नसेल तर हा लढा इथूनच सुरु होईल असही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

“राज्यभिषेक सोहळ्यानंतर शिवाजी महाराज छत्रपती झाले. महाराजांच्या इतिहासातून आपल्याला काय घ्यायचं हे ठरवलं पाहिजे. त्यांनी प्रस्थापितांऐवजी विस्थापितांना संधी दिली. शिवाजी महाराजांविरोधात अनेक शाह्या होत्या. अशातच शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला परंतु, त्यांना अडवण्यासाठी बाप-लेकांमध्ये भांडणे लावली. शहाजी राजेंवर मोठा दबाव होता. घराण्यात फूट पाडण्यासाठी अनेक जण तेव्हा पुढे आले होते. शहाजीराजे यांना आदिलशाहाने पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये शिवाजी महाराजांना घरात थांबवा नाही तर आपल्यात सामील करुन घ्या, असे सांगितले होते. परंतु, आपण यात पडत नाही, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे, असे उत्तर शहाजीराजे यांनी दिले होते. शहाजीराजे यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं करण्यासाठी मार्ग करून दिला. आणि शाहाजी महाराजांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया उभारला.”

“मी किल्ल्याचं संवर्धन – जतन सुरु केलं असून देशाच्या राष्ट्रपतींना देखील शिवाजी महाराजांसमोर आणलं आहे. परंतु, मला कोणी सांगितले की, उद्या राजीनामा द्या तर मी लगेच देईन, मला फरक पडत नाही. शिवाजी महाराज यांना मुघल दरबारात अपमानीत केले होते त्यावेळी ते तिथून निघून गेले. आम्ही त्याच शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. आम्ही आमच्या स्वाभिमानाला जपतो. शिवाजी महाराज यांनी सांगितले होते की, जिथे आपल्या स्वाभिमानाला जागा नाही तिथे आपण थांबायचं नाही.” असं म्हणत इतिहासातील उदाहरणे देत संभाजीराजे छत्रपती यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. दोन वर्षांनंतर रायगडावर होत असलेल्या या भव्य सोहळ्यास मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची विविध ठिकाणाहून लक्षणीय उपस्थिती होती.