टिओडी मराठी, दि. 3 जुलै 2021 – तुम्हाला अडुळसा ही औषधी वनस्पती माहित आहे ना… ? हि वनस्पती खूपच गुणकारी आणि औषधी आहे. या वनस्पतीमध्ये मानवी शरीरासाठी महत्त्वपूर्ण असे काही औषधी गुण आहेत. सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांवर अडुळसा गुणकारी आहे. तसेच अडुळसा इतर अनेक आजारांवरही गुणकारी आहे.
अडुळसा हे दोन-तीन फूट उंचीचे छोटीसी झुडूप असते. ही वनस्पती सदैव हिरवीगार असते तिला फुले आणि टोकाला फळे येत असतात. या वनस्पतीची लागवड पावसाळ्यामध्ये केली जाते.
अडुळसा कफनाशक असून खोकला, ताप असेल तर अडुळशाच्या रसाने ते कमी होतं. सर्दी आणि खोकल्यावर हे औषध म्हणून वापरलं जातं. त्याचबरोबर डेंग्य, ब्रॉंक्राईटीस, गळ्यात सूज येणे, डायरिया, हार्टबर्न, अस्थमा या आजारांवर अडुळसा गुणकारी उपाय आहे. अडुळशाची ७-८ पानं पाण्यात उकळावीत. नंतर हे पाणी गाळून त्यात मध मिसळून प्यावा.
अडुळशाचे अँटीव्हायरल गुणधर्म संसर्गावर उपचार करण्यास सक्षम ठरतात. अडुळसा शरीराचे तापमान कमी करतं, नाक मोकळं करतं. आजार बरा होण्याच्या प्रक्रियेस वेग देतं. जर त्वचेवर बॅक्टेरिअल फंगल इन्फेक्शन असेल तर त्यावर अडुळशाच्या पानांचा लेप लावतात.
अडुळशाची पाने बारीक वाटून ती जखमेवर बांधली तर जखम भरून येते. रक्तपित्त म्हणजे नाकातून अथवा तोंडातून रक्त येत असल्यास अडुळसा दिला जातो. 10 मि. लि. अडुळशाचा रस तितकीच खडीसाखर घालून घ्यावा. रक्त पडण्याचे कमी होते.अडुळशाच्या पानांचा डोक्यावर लेप घातला असता नाकातून वाहणारे रक्त बंद होते.
सांधेदुखीमुळे दैनंदिन कामांत व्यत्यय येतो. युरिक अॅसिडची शरीरातील वाढलेली पातळी अशा वेदनांना कारणीभूत आहे. अडुळसा युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यात मदत करते. या औषधी वनस्पतीचे सूज विरोधी गुणधर्म सांध्यातील सूजेस कमी करते.