पुणे: मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात इशारा दिलाय. समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असं वक्तव्य मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात केलंय. मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या वेळी ते बोलत होते.
त्याचा बाप बोगस होता, हा बोगस आहे, याच्या घरातील सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो की यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा घणाघात मलिक यांनी केलाय.
मलिक यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे आणि यास्मिन वानखेडे यांच्यावर नवा आरोप केलाय. कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.