टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 24 ऑगस्ट 2021 – बॅंकर्सच्या इंडियन बॅंकर्स असोसिएशन या संघटनेने रिझर्व बॅंकेकडे राष्ट्रीय मालमत्ता फेररचना कंपनी अर्थात बॅड बॅंक स्थापन करण्यासाठी परवानगी मागितलीय. बॅड बॅंकेची नोंदणी अगोदर कंपनी निबंधकाकडे केली आहे.
या संदर्भातील सर्व पेपरवर्क अगोदर झाले आहेत. आता रिझर्व्ह बॅंकेकडे आवश्यक ती परवानगी मागण्यात आली आहे. 2017 पासून या विषयावर चर्चा सुरु होती. काही आठवड्यातच रिझर्व्ह बॅंक आता बॅड बॅंकेला परवानगी मिळणार आहे, असे समजते.
याबाबत सूत्रांनी सांगितले की, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये रिझर्व बॅंकेकडून परवानगी मिळणार आहे. स्टेट बॅंकेतील वरिष्ठ अधिकारी पी एम नायर यांची या बॅंकेच्या व्यवस्थापक व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी बॅंकातील अनुत्पादक मालमत्ता वाढत चालल्याचा अर्थसंकल्पामध्ये उल्लेख केला होता.
ती मालमत्ता कमी करण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सांगितले होते. त्याचाच एक भाग म्हणून बॅड बॅंक स्थापन करावी लागणार आहे, असे त्यांनी सूचित केले होते. सरकारी बॅंकांच्या संघटनेने मागील वर्षी सरकारकडे बॅड बॅंक स्थापन करण्याची गरज आहे, असा प्रस्ताव सादर केला होता.
केंद्र सरकारने हा प्रस्ताव स्वीकारून त्यानंतर पुढची कार्यवाही सुरू केली होती. या बॅंकेच्या भागभांडवलात सरकारी बॅंकांचा वाटा 51 टक्के तर उरलेला वाटा खासगी बॅंकांचा असणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार बॅंकांनी 89 हजार कोटी रुपयांच्या 22 कर्जाची ओळख केली आहे. ही कर्जे बॅड बॅंकेकडे हस्तांतरित केले जातील.