मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो-करोडो रुपयांची देणगी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच ईडीमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी सोमय्यांवर कारवाई करावी, असं आव्हानही राऊतांनी यावेळेस दिलं आहे.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या हे स्वत:ला महात्मा समजतात. त्यांची एक घोषणा आहे की, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार, पण सर्वात मोठे भ्रष्टाचारी तेच आहेत. ते काय भ्रष्टाचार संपवणार. भ्रष्टाचाराची सुरूवात महाराष्ट्रात या लोकांनी केली आणि हेच मोठ्या भाजपच्या नेत्यांसोबत भ्रष्टाचाराबाबत चर्चा करतात की भ्रष्टाचाराविरोधात लढू.
मी गेल्या दोन दिवसात त्यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेच्या खात्यात जे पैसे येत आहेत, त्यामध्ये दिडशे पेक्षा अधिक कंपन्या आहेत, बिल्डर्स आहेत. अनेक संशयास्पद लोक आहेत, ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची चौकशी सुरू आहे, छापे टाकले जात आहेत. या सर्वांनी किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो-करोडो रुपयांची देणगी दिल्याचंही राऊतांनी यावेळेस सांगितलं आहे.
दरम्यान किरीट सोमय्या वारंवार म्हणतात कागद दाखवा, हे घ्या. प्रतिष्ठा काय फक्त तुमच्या पत्नी आणि मुलांची आहे, आमची नाही. प्रतिष्ठा सर्वांना आहे. किरीट सोमय्यांचा मुखवटा पूर्णपणे उतरला आहे. या देशात सर्वात मोठा भ्रष्टाचारी जर कोणी असेल तर ते सोमय्या आहेत, असा आरोपही राऊतांनी यावेळेस लगावला आहे.