मुंबई: परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने आता दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. २८ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबद्दल परब यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये ही समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे.
ईडीने सचिन वाझे याचा जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की पोलीस दल आणि परिवहन विभागाच्या बदल्यांमध्ये २० कोटी रुपये अनिल परब यांनी घेतल्याचं त्याने सांगितलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी परिवहन विभागाचे अधिकारी आणि परब यांच्या जवळचे मानले जाणारे बजरंग खरमाटे यांचीही चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता परब यांना दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे.
या पूर्वी ३१ ऑगस्ट रोजी परब यांना पहिलं समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे त्यांनी ईडीकडे १४ दिवसांची मुदत मागितली होती. ती तेव्हा ईडीने मान्यही केली होती. मात्र यावेळी आता परब हजर राहतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.