TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 13 जून 2021 – देशात सध्या राजकीय पक्षांना आगामी 5 विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. पुढील वर्षात होणार्‍या विधानसभा निवडणुका 2022 साठी काउंटडाउन सुरू झालंय.

राजकीय पक्षांनी आतापासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाशी हातमिळवणी करावी लागेल?, कोणत्या जुन्या शत्रूंना मित्र बनवावे लागतील. शेवटच्या क्षणी धक्का देता येईल?, या सर्व बाबींवर पडद्यामागून खेळ सुरू झालाय. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकाकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिलं जाणार आहे.

2022 मध्ये कोणत्या राज्यात निवडणुका होणार आहेत?. सध्या कोणाचे सरकार आहे?:

1. उत्तर प्रदेश राज्य :
नेहमीप्रमाणे उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण देशाचं लक्षं असते. 2017 च्या निवडणुकीमध्ये राज्यात भाजपने विक्रमी विजय नोंदविला होता. असे म्हणतात की, दिल्लीची सत्ता उत्तर प्रदेशने घेतली जाते. इथे कोणत्याही पक्षाला विजय मिळाला तर त्याचे सरकार दिल्लीत येते. त्यामुळे या वेळी येथे भाजप विजयासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. गेल्या वेळी येथे भाजपने 312 जागा जिंकल्या होत्या.

राजकीय समीकरणे : राज्यातील निवडणुकीची तयारी आतापासून सुरू झालीय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर आता निवडणुकीच्या चर्चा सुरु झाल्यात. दुसरीकडे काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये जात आहेत.

2. पंजाब राज्य :
चालू चित्र – सध्या पंजाब राज्यात कांग्रेसचे सरकार आहे. गेल्या निवडणुकीत भाजप युतीला पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. तर आम आदमी पार्टी दुसर्‍या क्रमांकावर होती. भाजप व शिरोमणी अकाली दल युतीने केवळ 15 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप व शिरोमणी अकाली दल यांची युती तुटली.

असे बदलेल राजकीय समीकरणे : यावेळी पंजाबमध्ये परिस्थिती बदललीय. सीएम कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याविरोधात काँग्रेसच्याच आमदारांनी मोर्चा उघडलाय. अशा परिस्थितीत काँग्रेससाठी सर्वप्रथम अंतर्गत लढाई सोडवावी लागेल. दुसरीकडे, पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी अकाली दल व बसपाने हातमिळवणी केलीय. असे म्हटले जात आहे की, ही युती दलित घटकांसह काँग्रेसला धक्का देईल. दुसरीकडे, आप देखील पक्ष मूठ बांधतोय.

3. गुजरात राज्य :
पुढील वर्षी गुजरातमध्येही निवडणुका होणार आहेत. मागील निवडणुकीमध्ये भाजपने येथे 99 जागा जिंकल्या होत्या. तर, काँग्रेसने 77 जागा जिंकत भाजपला झुंज दिली होती. पुढील वर्षी राज्यात काँग्रेसला भाजपकडून सत्ता मिळवता येईल का? हे पाहावं लागणार आहेत.

4. उत्तराखंड राज्य :
यंदा मार्चमध्ये भाजपने येथे मुख्यमंत्री बदललेत. त्रिवेंद्रसिंग रावत यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून तीरथसिंग रावत यांना कमांड दिलीय. अशा परिस्थितीमध्ये तीरथ सिंह भाजपची सत्ता टिकवून ठेवू शकतील की नाही? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या वेळी भाजपने येथे 57 जागा जिंकल्या होत्या.

5. हिमाचल प्रदेश राज्य :
पुढील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येथे निवडणुका होणार आहेत. सध्या इथे भाजपचे सरकार आहे. 2017 मध्ये भाजपने 44 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ 21 जागांवर समाधान मानावे लागले.

लोकसभा निवडणुका  2024 मध्ये होणार आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांतील विजयामुळे केंद्रामध्ये कोणत्याही पक्षाची सरकार स्थापन होण्याची आशा निर्माण होते.

पुढच्या वर्षी ज्या राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत, त्या बहुतेक राज्यामध्ये सध्या भाजपचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत भाजप पुन्हा एकदा या राज्यांतील सत्ता टिकवून ठेवू शकेल काय?, असा प्रश्न आहे. काँग्रेस पक्षासाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे.

(टीप : ‘टिओडी मराठी’च्या वाचकांसाठी विविध इंटरनेटवरील माहिती संकलित आहे.)