TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 23 मे 2021 – कुस्तीपटू सागर राणा हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली. अटक टाळण्यासाठी तो ७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून फिरल्याचे समजले. 4 मे च्या रात्री सागर राणाची छ्त्रसाल स्टेडियमजवळ हत्या झाली होती. तेव्हापासून सुशील कुमार गायब होता. न्यायालयाने सुशील कुमारच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट देखील काढलं होतं. पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देणाऱ्यास १ लाख तर त्याचा मित्र अजय बक्करवालाची माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचा बक्षीस जाहीर केलं होतं

दिल्ली पोलिसांनी रविवारी सकाळी सुशील कुमारला मुंडका परिसरातून अटक केली. यावेळी सुशील कुमार बाईकवरून पोलिसांना गुंगारा देऊन निसटण्याच्या प्रयत्न करत होता.

एएनआयने दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सागर राणाच्या मृत्यूनंतर ४ मे रोजी मध्यरात्रीपासून कुस्तीपटू सुशील कुमार फरार होता. तो सातत्याने त्याचं ठिकाण बदलत होता. तसेच, या १८ दिवसांत त्याने अनेकदा सिमकार्ड देखील बदलले.

या काळात सुशील कुमार उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, चंदीगढ आणि पंजाब या राज्यांत फिरला. दिल्लीची सीमारेषा त्यानं दोनदा पार केली. त्यामुळे एकूण ६ वेळा राज्यांच्या सीमा आणि चंदीगढ या केंद्रशासित प्रदेशाची सीमा सुशील कुमार यानं ओलांडली.

सागर राणाचा मृत्यू झाल्यानंतर सुशीलकुमार उत्तराखंडमध्ये ऋषीकेशला गेला. तिथे तो एका साधूंच्या आश्रमात राहिला. तिथून दुसऱ्याच दिवशी तो दिल्लीमध्ये आला. मीरत टोल प्लाझावर तो सीसीटीव्हीत कैद झाला.

दिल्लीहून तो हरयाणामध्ये बहादूरगडला गेला. तिथून तो चंदीगडला गेला. चंदीगडहून सुशिलकुमार पंजाबमध्ये भटिंडाला गेला. भटिंडाहून तो माघारी गुरुग्रामला आला.

पश्चिम दिल्लीत तो काही काळ राहिला. इथूनही त्याचा पुन्हा निसटण्याचा प्रयत्न होता. मात्र, बहादूरगडचा रहिवासी असलेल्या बबलूनं सुशिलकुमार कोणती कार वापरतोय?, हे सांगितल्यामुळे पोलिसांचा त्याचा माग काढणं सोपं झालं. मात्र, आज त्याचा मित्र अजयसोबत एका बाईकवरून जाताना पोलिसांनी मुंडका परिसरातून त्याला अटक केली.

काही दिवासांपासून दिल्ली पोलीस उत्तराखंड, पंजाब, हरयाणा आणि खुद्द दिल्लीमध्येही अनेक ठिकाणी सुशील कुमारचा शोध घेत होते. यादरम्यान, सुशिलकुमारनं अटकपूर्व जामिनासाठी देखील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावत त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढली. तसेच, अजामीनपात्र वॉरंटदेखील जारी केलं होतं.