टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 24 मे 2021 – रशियन लस असलेल्या ‘स्पुटनिक व्ही’चे भारतीय कंपनी पॅनासिया बायोटेकने उत्पादन सुरु केलं आहे. हे उत्पादन रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडच्या मदतीने सुरु केलं आहे. ‘स्पुटनिव्ह व्ही’ लसचे वर्षाला 10 कोटी डोस पॅनासिया कंपनी तयार करणार आहे. लस निर्मितीसाठी आरडीआयएफ व पॅनासिया बायोटेकने करार केला होता. त्या करारानुसार लस निर्मिती सुरु झालीय. त्यामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.
हिमाचल प्रदेशातील बद्दी कारखान्यामध्ये पॅनासिया बायोटेक कंपनीने ‘स्पुटनिक व्ही’ लसची निर्मिती सुरु केलीय. या कारखान्यामध्ये तयार केलेल्या लसीची पहिली खेप रशियाच्या गामालेया केंद्रात पाठवली जाणार आहे. तिथे या लसची गुणवत्ता पारखली जाणार आहे.
आम्ही भारतामध्ये पॅनासिया बायोटेकसोबत उत्पादन सुरु केले आहे. यामुळे देशातील कोरोना स्थितीशी लढण्यात मदत होणार आहे. भारतात लसींची पूर्तता झाल्यानंतर इतर देशांत त्याची निर्यात केली जाणार आहे, असे आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल्ल डमित्रिव यांनी सांगितले आहे.
भारतामध्ये ‘स्पुटनिक व्ही’ लसची निर्मिती सुरु झाल्यामुळे त्याचा भारताला फायदा होणार आहे. लसीकरण मोहीम वेगाने झाल्यास पुन्हा सामान्य जीवन जगता येईल, असे पॅनासिया बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैन यांनी सांगितले आहे.