West Bengal Election 2021 Updates : बंगालमध्ये तृणमूलची आघाडीकडे वाटचाल; पण, ममता नंदीग्राममधून पिछाडीवर!

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 2 मे – सध्या बंगालमध्ये निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसची जादू चालली आहे. आज मतमोजणी सुरु असून यात तृणमूलने 162 जागांवर आघाडी घेतली आहे. यामुळे बहुमताचा 147 चा आकडा तृणमूल सहज पार करील असे दिसत आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांची जागा अडचणीत आहे. त्या नंदीग्राममधून पिछाडीवर असल्याचं समजत आहेत. सकाळी 11 पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजपच्या ‘200 पार’ च्या आशेवर पाणी फिरल्याचे दिसते आहे.

पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली. पण, बहुमतापासून भाजप दूर असल्याचे दिसत आहे. मागील निवडणुकीत अवघ्या तीन जागांवर विजय मिळवलेली भाजप आता शंभरीच्या घरात जाईल, असा कल सांगत आहे.

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला रविवारी सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या तास – दीड तासात दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरु होती. एकवेळ तर तृणमूलपेक्षा भाजपचे उमेदवार आघाडीवर दिसत होते. मात्र, साडेनऊ वाजल्यानंतर मतमोजणी पुढे सरकू लागली, तशी तृणमूलची आघाडी वाढत असल्याचे दिसू लागले.

सकाळी दहाच्या सुमारास राज्यात पुन्हा तृणमूलचे सरकार बनणार असल्याचे स्पष्ट चित्र झाले आहे. सलग तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांना बंगालच्या सत्तेवर आरूढ होण्याची संधी मिळणार आहे. ताकत वाढलेल्या भाजपसमोर आता त्या कशा पद्धतीने लढा देणार?, हेच पहावे लागेल.

Please follow and like us: