केंद्राकडून येणारा ऑक्सिजन, रेमडेसिविरचा पुरवठा केवळ पॉवरफुल मंत्र्यांच्या जिल्ह्यात : देवेंद्र फडणवीस

टिओडी मराठी, पालघर, दि. 1 मे 2021 -देशातील कोरोनाच्या फैलावाचे मुख्य केंद्र महाराष्ट्र बनला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला ऑक्सिजनसह रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा पुरवत आहे. मात्र, याचे योग्यप्रकारे वाटप होत नाही. ऑक्सिजन व रेमडेसिविरचा साठा पॉवरफूल मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये होत आहे. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील लोकांवर अन्याय होत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

शनिवारी पालघर जिल्ह्यातील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पालघरसारख्या जिल्ह्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असून एखाद्या जिल्ह्यात किती रुग्ण, बेडस् आणि आरोग्य सुविधा आहेत?, याचा विचार केला जात नाही. ताकदवान नेते केंद्राकडून आलेली मदत आपापल्या जिल्ह्यांत नेत आहेत. मंत्री हे सर्व राज्याचे असतात, त्यामुळे त्यांनी सगळं आमच्याच जिल्ह्यात आलं पाहिजे, अशी मानसिकता ठेऊ नये, असे देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

…तर आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल’
महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. पहिल्या लाटेत कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला बाधा होत होती. मात्र, आता संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब कोविडबाधित होत आहेत. तसेच यावेळच्या लाटेत सर्व वयोगट व समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना कोरोनाची लागण होत आहे, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.

इतक्या अधिक प्रमाणावर रुग्ण वाढत असल्याने आरोग्यव्यवस्था परिस्थिती हाताळण्यात कमी पडत आहे. मात्र, या लाटेत 70 ते 80 टक्के रुग्णांत कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. त्यांच्यावर मोजके उपचार करुन त्यांना बरे केले जाऊ शकते. मात्र, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वजण रुग्णालयांत धाव घेत आहेत. परिणामी आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढतोय. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती दूर केली पाहिजे, जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवरील ताणही कमी होईल, असेहि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Please follow and like us: