महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना अभिवादन; साधेपणाने राज्याचा 61 वा वर्धापन दिन साजरा

टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 मे 2021 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून साधेपणाने राज्याचा 61 वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच मुख्यमंत्री यांनी कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या.

यावेळी राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, पोलीस महासंचालक संजय पांडे, महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनीहि हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

1 मे अर्थात आजपासून राज्यात १८ ते ४५ वर्षांमधील लोकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. हे लसीकरण मोफत केले जाणार आहे. काही मोजक्या लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. त्यांनी कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्व वीरांना विनम्र अभिवादन केले. राज्यातील रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. गेल्या वर्षीही महाराष्ट्र दिन कोरोनाच्या सावटात गेला. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला यश आले आहे. राज्यातील लोकांनी समजूतदारपणा दाखवल्याने पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार नाही, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लॉकडाऊन करावा लागणार नाही, असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा असून महाराष्ट्राला सहजासहजी काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केलाय. महाराष्ट्र राज्याची स्थापनाही संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून झालीय. सीमा भागामधील मराठी गावांना महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी तसेच कोरोनाच्या संकटावर विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा संघर्ष आजही सुरुय. महाराष्ट्रातील जनतेची एकजूट, निर्धाराच्या बळावर महाराष्ट्र ही दोन्ही उद्दीष्टे साध्य करील,” असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा संदेशात असे म्हंटले आहे कि, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये सहभागी महाराष्ट्रवीरांच्या त्यागाचं स्मरण करुन कृतज्ञता व्यक्त केली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील शहीद वीरांना आदरांजली वाहिलीय. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी पाहिलेलं, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात सामील करण्याचं स्वप्न अद्याप अपूर्ण आहे.

सीमा भागातील शेवटचं मराठी गाव महाराष्ट्र राज्यात येईपर्यंत आपला लढा सुरुच राहील, याचा पुनरुच्चारही उपमुख्यमंत्र्यांनी केलाय. महाराष्ट्र राज्यावरील कोरोना संकटाविरुद्ध महाराष्ट्र एकजूटीनं, निर्धारानं लढत आहे. महाराष्ट्र राज्यातील डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक सर्वजण जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देताहेत. या सर्व कोरोनायोद्ध्यांच्या सेवाकार्याची नोंद इतिहासात होईल, असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

Please follow and like us: