संजय राऊत म्हणाले, देशामधील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समिती स्थापन करावी

टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 मे 2021 – सध्याच्या परिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारण सोडून काम केलं तरच हा देश वाचेल. अन्यथा, देशात केवळ मुडद्यांचं राज्य राहील, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. तसेच कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समिती स्थापन करावी. या समितीद्वारे कोरोनाची परिस्थिती हाताळली जावी, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केलीय.

संजय राऊत शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती मानून निर्णय घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केलाय. अनेक राज्यांतील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेलीय. सर्वोच्च न्यायालयाने अनेक गोष्टींवरून केंद्र सरकारला फटकारलं आहे. हे अगोदर व्हायला पाहिजे होतं. महाराष्ट्र राज्याला कोरोना लसींचा म्हणावा तेवढा पुरवठा केंद्राकडून होत नाही. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ आलीय, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केवळ फटकारून काय साध्य होणार आहे ? राष्ट्रीय आपत्ती असूनही केंद्र सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नसेल तर हे केंद्र सरकारचं नियंत्रण सुटल्याचं हे द्योतक आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर एक समिती स्थापन करावी. सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकार या राष्ट्रीय समितीद्वारे कोरोना परिस्थिती हाताळतील. जेणेकरून कुठल्याही राज्यावर अन्याय होणार नाही. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन्स व लसींच्या पुरवठ्यावर केंद्र सरकारने योग्य नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Please follow and like us: