दिलासादायक; नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये विक्रमी GST कलेक्शन!

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 1 मे 2021 – करोनामुळे देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला. काही राज्यांनी वाढत्या रुग्णांमुळे कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रोजगार व उद्योग धंद्यावर परिणाम झाला. असं असलं तरी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये विक्रमी जीएसटी कलेक्शनची नोंद झालीय.

सलग सातव्या महिन्यात १ लाख कोटीच्या वर जीएसटी मिळालाय, अशी माहिती अर्थ खात्याने ट्विटरवर दिलीय. २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर हे सर्वात विक्रमी उत्पन्न आहे. त्यामुळे मागील सलग सात महिने एक लाख कोटींचे जीएसटी उत्पन्न मिळाल्याने केंद्र सरकारला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

एप्रिल २०२१ या महिन्यात एकूण १ लाख ४१ हजार ३८४ लाख कोटींचा जीएसटी मिळालाय. देशामध्ये जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी आहे. या जीएसटीमध्ये केंद्राचा २७,८३७ कोटी, राज्याचा ३५,६२१ कोटी, एकीकृत जीएसटी ६८,४८१ कोटी रुपये आहे. त्यात उपकर ९,४४५ कोटींचा आहे. मागच्या मार्च महिन्यामध्ये १ लाख २३ हजार ९०२ कोटींचा जीएसटी वसूल केला होता.

ऑक्टोबर (२०२०) महिन्यामध्ये १,०५,१५५ कोटी, नोव्हेंबर (२०२०) महिन्यात १,०४,९६३ कोटी, डिसेंबर (२०२०) महिन्यात १,१५,१७४ कोटी, जानेवारी (२०२१) महिन्यात १,१९,८४७ कोटी, फेब्रुवारी (२०२१) १,१३,१४३ कोटी, तर मार्च (२०२१) या महिन्यात १,२३,९०२ कोटींचा जीएसटी वसूल केला होता.

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्यानंतर जीएसटीच्या वसुलीत वाढ झाली होती. मात्र, एप्रिल महिन्यापासून पुन्हा एकदा करोनाची दुसरी लाट आल्याने स्थिती गंभीर झाली आहे.

Please follow and like us: