बंगालमध्ये ममता, मोदींपेक्षाही शुवेंदू अधिकारी ‘यांचीच’ जास्त चर्चा!; जाणून घ्या, कोण आहेत शुवेंदू अधिकारी?

टिओडी मराठी, कोलकाता, दि. 2 मे – ममता बॅनर्जी यांच्या विश्सासातले समजले जाणारे आणि तृणमूलच्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारे नेते शुवेंदू अधिकारी यांनी मागील डिसेंबर महिन्यात ममता बॅनर्जींना मोठा झटका दिला होता. त्यांनी 11 आमदारांसह भाजपची वाट धरली. तेव्हा या निवडणुकीमध्ये शुवेंदू अधिकारी यांची चर्चा सुरू झाली.

नंदिग्राम मतदारसंघामध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वतः उभं राहून शुवेंदू अधिकारी यांना थेट आव्हान दिलंय. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी 10.30 वाजेर्पंयतच्या मतमोजणीच्या कलानुसार बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस बहुमताच्या जवळ पोहोचण्याचा अंदाज असला, तरी नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जींना शुवेंदू अधिकारी यांनी तगडी लढत दिली आहे, हे स्पष्ट आहे. पहिले तीन तास या मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये शुवेंदू अधिकारी आघाडीवर होते. ममता बॅनर्जींना पिछाडीवर टाकणारा नेता म्हणून त्यांची चर्चा आहे.

ममता यांचे अत्यंत विश्वासू म्हणून अधिकारी यांना ओळखले जात होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मंत्रिपदाचा आणि तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

नंदिग्राममध्ये प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ममता बॅनर्जींचा अपघात झाला. यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. आपल्यावर हल्ला झाला, अपघात घडवून आणला असे त्यांनी विरोधकांवर आरोप केले. यामुळे शुवेंदू अधिकारी पुन्हा चर्चेत आले.

शुवेंदू यांचे वडील शिशिर अधिकारी हे तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते तसेच खासदारही होते. त्यांच्या शुवेंदू आणि सौमेंदू या दोन मुलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा तिसरा मुलगा दिव्येंदू अधिकारी हा तृणमूलचा खासदार आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिशिर अधिकारी यांनीही मोदींच्या सभेला उपस्थिती लावून शुवेंदूंना साथ दिली.

त्यामुळे बंगाल निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत शुवेंदू अधिकारी यांचीच चर्चा अधिक असल्यामुळे याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

Please follow and like us: