उच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं!; म्हणाले, आता डोक्यावरून पाणी गेलंय, लवकर ऑक्सिजन पुरवा

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 1 मे 2021 – देशात कोरोना अधिक प्रमाणात पसरला आहे. तसेच ऑक्सिजनची तुटवट्यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यावरून उच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं आहे. आता डोक्यावरून पाणी गेलंय, लवकर ऑक्सिजन पुरवा, अशा शब्दांत न्यायालयानं केंद्राला सुनावलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता सोमवारी होणार आहे.

देशात करोना रुग्णांवर उपचारांसाठी अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असल्याच्या घटना समोर येताहेत. राजधानी दिल्लीच्या बत्रा रुग्णालयामध्ये आज दुपारी घडलेल्या दुर्घटनेमध्ये ऑक्सिजनअभावी ८ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मागील काही दिवसांपासून दिल्लीत ऑक्सिजन पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचे पडसाद दिल्ली उच्च न्यायालयात या सुनावणीमध्ये देखील दिसत आहेत.

आज याच सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला परखड शब्दांत फटकारले आहे. “आता पाणी डोक्यावरून गेलंय. आता आम्हाला अंमलबजावणी हवी आहे. तुम्ही आता सगळ्याची व्यवस्था करणार आहात. काहीही करून दिल्लीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला पाहिजे”, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेत.

दिल्लीच्या बत्रा रुग्णालयात ऑक्सजन पुरवठ्याअभावी ८ रुग्णांसह एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील काही रुग्णालयांनी उच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी धाव घेतलीय. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही, अशी तक्रार या रुग्णालयांकडून केली जात आहे. तर केंद्र सरकारकडून जाहीर केलेला साठा ही पुरवला जात नाही, अशी बाजू राज्य सरकारने मांडली आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात दररोज सुनावणी सुरू आहे. यात दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन्ही सरकारांना न्यायालयाने वेळोवेळी सुनावले आहे.

बत्रा रुग्णालयामध्ये 8 रुग्णांसह डॉक्टरचा मृत्यू
आज सकाळी दिल्लीच्या बत्रा रुग्णालयाने उच्च न्यायालयाला ऑक्सिजन संपल्याची माहिती दिलीय. “आम्ही सकाळी ६ वाजेपासून एसओएसवर आहोत”, असं रुग्णालयाने सांगितलं होतं. दुपारच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर रुग्णालयाच्या वतीने न्यायालयातच याची माहिती दिली. “१२ वाजता आमचा ऑक्सिजन संपला. अन नवीन साठा दीड वाजता आला. त्यामुळे ८ रुग्णांसह एका डॉक्टरचा मृत्यू झाला”, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. या सगळ्या प्रकारावर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावलं आहे.

कोट्यापेक्षा जास्त ऑक्सिजन कोणही मागत नाही”
“आम्ही केंद्र सरकाराला निर्देश देतो की, त्यांनी काहीही करून दिल्लीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवाला पाहिजे. त्यासाठीचे टँकर पुरवण्याची जबाबदारीही केंद्राची आहे. २० एप्रिलला ऑक्सिजन पुरवठ्याचा निर्णय सरकारने घेतला. पण, तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस दिल्लीला ठरलेला पूर्ण ऑक्सिजनचा कोटा मिळालेला नाही. कुणीही तुम्हाला ठरल्यापेक्षा अधिक ऑक्सिजन मागत नाही. जर तुम्ही आज पुरवठा करू शकला नाहीत, तर आम्ही सोमवारी तुमचं विश्लेषण ऐकू”, अशा शब्दांत न्यायालयाने सुनावले आहे.

दिल्लीमध्ये 15 हजार नवे बेड
या दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला आवश्यक व्यवस्था उभारण्यासाठी लष्कराची मदत घेण्याचा सल्ला दिलाय. “जर तुम्ही लष्कराची मदत घेतली, तर ते त्यांच्या स्तरावर काम करतील. त्यांच्याकडे त्यांची स्वत:ची व्यवस्था आहे”, असे न्यायालयाने दिल्ली सरकारला सांगितलंय. यावर दिल्ली सरकारकडून अॅडव्होकेट राहुल मेहरा यांनी “आम्ही त्यावर काम करत आहे. आमचं सरकार त्यासंदर्भात बोलणी करत आहे. आम्ही १५ हजार नवे बेड तयार करत आहोत’, अशी माहिती न्यायालयाला दिलीय.

Please follow and like us: