गुलाबराव पाटलांचं गिरीश महाजनांना आव्हान!; म्हणाले … तर चौकात गिरीश महाजनांचा सत्कार करीन

टिओडी मराठी, दि. 1 मे 2021 – काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर परखड शब्दांत टीका केली होती. तसेच, त्यांच्या एका व्हायरल ऑडिओ क्लिपवरून दोन्ही नेत्यांत सुंदोपसुंदी झाली होती. आता पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर महाविकासआघाडीतल्या नेत्यानं निशाणा साधलाय. शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातल्या लसीकरणावरून गिरीश महाजन यांना सुनावलंय.

“गिरीश भाऊंना माझा सल्ला आहे. पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांनी गिरीशभाऊंना वर स्टेजवर बोलावलं होतं. जर त्याचा काही प्रभाव पडला असेल, तर अधिक लस जळगावसाठी व महाराष्ट्रासाठी त्यांनी आणावी. गिरीशभाऊंनी आवश्यक तो लसीचा साठा महाराष्ट्रासाठी मिळवून दिलाय, तर त्यांचा मी भर चौकामध्ये सत्कार करीन”, असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांना दिलंय.

या दरम्यान, राज्यामध्ये सुरू असलेला लसीकरणाचा कार्यक्रम व उपलब्ध होणारा लसीचा साठा या मुद्द्यावरून गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधलाय. “जर राज्य सरकार पूर्ण लसी घ्यायला तयार असेल, तर लस देण्याचा अधिकार कुणाला आहे? हे मी सांगण्यापेक्षा गिरीशभाऊंना माहिती आहे. राजकारण कोण करतंय? हे गिरीश भाऊंना माहिती आहे. जर लस पूर्ण उपलब्ध असल्या, तर महाराष्ट्र सरकारची आरोग्य यंत्रणा एवढी सज्ज आहे की दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण राज्याला लसीकरण करू शकते. पण, जोपर्यंत लसीकरणाचा कोटा आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत इथे परमेश्वर जरी आला, तरी लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही”, असं देखील त्यांनी म्हंटलं आहे.

‘त्या’ ऑडिओ क्लिपवरून खडसे विरुद्ध महाजन वाद
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात एका मुलाने गावात पाणी नसून आमदार गिरीश महाजन माझा फोन उचलत नाहीत, अशी तक्रार केली होती. त्यावर खडसेंनी “बरोबर आहे, तो केवळ मुलींचेच फोन उचलतो”, असं विधान केलंय.

यावर गिरीश महाजन यांनी “मी त्यासाठी एकनाथ खडसेंना दोष देणार नाही. कारण वाढतं वय, इतके आजार व त्यात जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता, त्याला आज आमदारकीही मिळत नाही. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं झालंय”, असा पलटवार महाजन यांनी केला होता. त्यावर खडसेंनीही “गिरीशभाऊंना मी आत्ता ओळखत नाही. १९९४-९५ मध्ये फर्दापूरला अशाच प्रकारची घटना घडली होती. तेव्हापासून आजतागायत सगळा इतिहास मला माहिती आहे. सगळ्या जनतेलाही माहिती आहे”, असं म्हणत खडसे यांनी गिरीश महाजनांवर शाब्दिक हल्ला केला होता.

Please follow and like us: