कोरोनाग्रस्तांना ग्रामीण रुग्णालयाचा आधार, रेमडेसिविरशिवाय रुग्ण होताहेत कोरोनामुक्त

टिओडी मराठी, लातूर, दि. 1 मे 2021 – कोरोनाचा आज सर्वांनीच धसका घेतला आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण बरा होण्यासाठी मोठ्या खासगी हॉस्पिटल्सकडे लाखो रुपये खर्चून उपचार करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. मात्र, लातूर जिल्ह्यातल्या औसा ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर्स आणि स्टाफच्या परिश्रमामुळं गंभीर अवस्थेत असलेल्या १६ कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन शिवाय उपलब्ध औषधांचा योग्य वापर करून उपचार दिले जात आहेत. तसेच कमी खर्चात रुग्णांना कोरोनमुक्त केलं आहे.

लातूर जिल्ह्यात दररोज किमान दीड हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण वाढत असताना व त्यात डॉक्टरांनी रेमाडेसिवीर इंजेक्शनचं प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्यावर नातेवाईकांना होणार त्रास, ऑक्सिजन, बेड यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी 16 एप्रिलला ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेड तयार करून कोविड रुग्णालय सुरू केलंय.

औसा इथं आजपर्यंत 40 अत्यवस्थ रुग्ण दाखल झालेत, ज्यात अनेकांचा सिटी स्कॅनमध्ये काहींचा 20 पेक्षा अधिक स्कोअर होता. ग्रामीण रुग्णालयामध्ये उपलब्ध औषधं व इंजेक्शन याचा योग्य वापर करून डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफने आज 16 अत्यवस्थ रुग्ण कोरोनामुक्त केलंय. इथं कोरोना वार्डात काम करताना सुरुवातीला भीती वाटत होती पण, या कामात समाधान मिळत आहे, असे नर्सेस सांगतात आहेत. तर औषधांचा काटकसरीने व योग्य वापर केल्याने हे शक्य झालंय, असं डॉक्टर सांगत आहेत.

रुग्णांची अवस्था बिकट असताना ही डॉक्टरांनी कमी वेळात कसलाही अधिकचा खर्च लागू न देता रुग्णाला ठणठणीत बरं केल्याचं समाधान रुग्णांच्या नातेवाईकांना वाटत आहे. एकीकडं गंभीर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे. मात्र, ग्रामीण भागातल्या लोकांना हा खर्च परवडणारा नाही, त्यामुळं ग्रामीण रुग्णालयांनी ग्रामीण भागातल्या लोकांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.

Please follow and like us: